जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४
भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे एका तरुणाला ४ ते ५ जणांनी घरातून शेतात बोलावून बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेमुळे भुसावळ तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोजोरा येथे विनोद गंभीर कोळी (वय २७) हा तरुण आई, वडील, २ भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. या घटनेबाबत विनोदचे वडील गंभीर कोळी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी संशयित जितू प्रभाकर डोळे, समा प्रभाकर डोळे यांनी विनोदला मारहाण केली होती. तर शुक्रवारी ही विनोद घरी एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित श्रावण सुपडू डोळे यांच्या मुलाने शेतात बोलावून घेतले. त्यानंतर शेतात संशयित श्रावण डोळे, जितू डोळे, समा डोळे यांच्यासह काही संशयितांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी त्याला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यास उपचारार्थ हलवण्यात आले.
परंतु, जळगाव येथील शासकीय रुग्णालयात त्याला तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. दरम्यान, घटनेची भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस अधिकारी अमोल पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी जळगाव रुग्णालयात येवून कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, भुसावळ तालुक्यात खून झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.