शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे व्याख्यान
जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५
तंबाखू, दारूच्या व्यसनामुळे व्यक्तीची सामाजिक, मानसिक, आर्थिक उन्नती थांबते. शारीरिक नुकसान प्रचंड प्रमाणात होण्यास सुरुवात होते. कर्ज आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात. व्यसनांमुळे जीवनाची गुणवत्ता आणि एकूणच स्वतःचे कल्याण प्रभावित होऊ शकते, असे प्रतिपादन निम्हान्स इन्स्टिट्यूट, बेंगलोर येथील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. धरव शहा यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दारू व तंबाखूमुळे निर्माण होणारी व्यसनाधीनता आणि त्याचे दुष्परिणाम या विषयावर डॉ. धरव शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी विचारमंचावर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, मनोविकार विभागाचे प्रमुख डॉ. विकास गायसमुद्रे उपस्थित होते. प्रस्तावनेतून, व्य्याख्यान घेण्यामागील उद्देश डॉ. शताक्षी वाघजाळे य्यानी सांगितला.
यावेळी डॉ. धरव शाह यांनी सांगितले की, व्यसनांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आणि परस्पर संबंधांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. बऱ्याचदा, लोकांना या हानिकारक वर्तनाचे नकारात्मक परिणाम कळत नाहीत. म्हणूनच, व्यसनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी त्याचे परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. व्यक्तीला चिंता, नैराश्य आणि कमी आत्मसन्मान होऊ शकतो. शिवाय, व्यसनामुळे लक्ष केंद्रित करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. यासाठी व्यसनाला नकार देणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रम हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या मानसोपचार विभागातर्फे संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. शताक्षी वाघजाळे, डॉ. राहूल पाटील, मानस समुपदेशक विजयेंद्र पालवे, डॉ. अनिरुद्ध साळूंखे, मानसोपचार तज्ज्ञ दौलत निमसे, समुपदेशिका ज्योती पाटील, राखी भगत, रेबीका लोंढे, अक्षय धोंडगे आदींनी परिश्रम घेतले.




















