जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक जिल्ह्यात साखळी उपोषण सुरु असून मनोज जरांगे पाटील हे देखील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे पण अशाच एका ठिकाणी सुरु असलेल्या उपोषणातून दुर्देवी बातमी समोर आली आहे. हिंगोलीत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषणामध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शिंदी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान प्रकाश नामदेवराव मगर (वय ५५) या उपोषणकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. हिंगोलीतील बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. मगर हे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन व उपोषणामध्ये सक्रिय सहभागी झाले होते. सध्या प्रकाश मगर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.