जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील पंचायत समितीमध्ये ५ लाखांची मागणी करत रक्कम स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या जळगावच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्यास आज दि.१ डिसेंबर रोजी सीईओ श्री अंकित यांनी निलंबित केले असुन तसे आदेश पारीत करण्यात आले आहे.
चौकशी समितीत अनुकुल असा रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात ५ लाखांची मागणी करत जळगाव लाचलुचपत विभागाने १३ नोव्हेंबर रोजी जळगावचे सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे (वय-५४) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (वय-५३) यांना रंगेहाथ पकडले होते त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या घटनेनंतर मंगळवारी दोन्ही अधिकारी सकाळी १०.३० वाजता पंचायत समितीत रुजू होण्यासाठी आले. प्रशासन अधिकाऱ्यांनी मस्टरवर स्वाक्षरी करण्याबाबत रोखल्यामुळे दोन्ही अधिकारी व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यादरम्यान चांगलाच वाद झाला होता.
जि.प प्रशासनाला अॅन्टी करप्शन विभागाने या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याचा अहवाल पाठविल्यानंतर आज सीईओंनी दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले असुन तसे आदेश सायंकाळी पारीत करण्यात आले असल्याचे सीईओंनी सांगितले