
जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२६
जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ बायपासवर अपघातानंतर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ट्रॅक्टरचालकाने अचानक टोकाचा निर्णय घेत ट्रकसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ५ एप्रिल रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल राजेंद्र बावस्कर (वय ३०, रा. आसोदा, ता. जळगाव) असे मृत ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. ते मूळचे मध्यप्रदेशातील लिंगा (ता. नेपानगर) येथील रहिवासी असून सध्या आसोदा येथे वास्तव्यास होते व ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते. घटनेच्या दिवशी रात्री त्यांच्या घरी कुटुंबीयांसोबत काही वाद झाला होता. त्यानंतर ते ट्रॅक्टर घेऊन घराबाहेर पडले. पाळधी ते तरसोद बायपास मार्गावर ते विरुद्ध दिशेने (राँग साईड) जात असताना समोरून येणाऱ्या कारला ट्रॅक्टरची धडक झाली.
अपघातानंतर कारचालक आणि बावस्कर यांच्यात रस्त्याच्या कडेला चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेदरम्यान अचानक बावस्कर यांनी बाजूने येणाऱ्या ट्रकसमोर स्वतःला झोकून दिले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर तालुका पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.





















