जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२३
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक जिल्ह्यात मोठे आंदोलन सुरु आहे तर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पाणी प्यावे अशी विनवणी करीत असताना देखील पाटील मात्र आंदोलनावर ठाम आहे दुसरीकडे बीड जिल्ह्यात या आंदोलनाची तीव्रता वाढली असून राष्ट्रवादी भवन पेटवल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला देखील आग लावण्यात आलेली आहे. या शिवाय माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय पेटवून देण्यात आलेलं आहे.
राज्यातील अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते मानले जाणारे सुभाष राऊत यांचं देखील हॉटेल पेटवून टाकण्यात आलं आहे. बीड शहरामध्ये आगीच्या चार ते पाच घटना घडल्या आहेत. आंदोलकांनी शांतता पाळावी, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
जाळपोळीच्या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, असं आंदोलन करणारे लोक मराठा असू शकत नाही. कुणीतरी आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्वांनी शांत राहून आंदोलन करावं. नाहीतर उद्या मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं जरांगे म्हणाले.