जळगाव मिरर | २० जुलै २०२५
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाइलवर रमी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी यावर जोरदार टीका करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ X (माजी ट्विटर) वर शेअर करत कृषीमंत्र्यांवर थेट निशाणा साधला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले –
“जंगली रमी पे आओ ना महाराज…!”
“कधी_शेतीवर_या_महाराज”, “खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या”
या हॅशटॅगसह त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.
रोहित पवार म्हणाले,
“सत्ताधारी राष्ट्रवादी गट भाजपला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबितच राहतात. रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना कृषीमंत्री मात्र मोबाइलवर रमी खेळण्यात व्यस्त आहेत.”
“रस्ता भरकटलेल्या मंत्र्यांना आणि सरकारला ‘पिक विमा’, ‘कर्जमाफी’, ‘भावांतर’ यांसारख्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या ऐकू येत नाहीत. गरीब शेतकऱ्यांची आर्त हाक – ‘कभी गरीब किसानो की खेतीपर भी आओ ना महाराज’ – तुम्हाला कधी ऐकू येईल का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढतात
महायुती सरकारमधील अनेक मंत्री व आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार संजय शिरसाट यांचा बनियानमधील आणि खोलीत रोख रक्कम असलेल्या बॅगसह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याआधी आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीन चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ चर्चेत आला होता.आता खुद्द कृषीमंत्रीच रमी खेळताना समोर आल्यानंतर, सरकारमधील शिस्त, जबाबदारी व शेतकरी प्रश्नांकडे असलेल्या गंभीरतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
