जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सौ. सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना वर्धा येथे महात्मा गांधींजी यांनी निवास केलेल्या सेवाग्राम आश्रमास आणि आचार्य विनोबा भावे यांनी निवास केलेल्या पवनार येथील परमधाम आश्रमास भेट देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांना अभिवादन केले.
सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांचे निवास असलेले बापू कुटी, कस्तुरबा गांधी यांचे निवास असलेली बा कुटी, गांधीजींचे कार्यालय असलेले बापू दप्तर, आणि आखरी निवास, आदीनिवास, प्रार्थना भूमी ची त्यांनी पाहणी केली तसेच त्यासोबतच ग्रामोद्योग, सूतकताई, रंगाई, विनाई, पुस्तकालय, खादी उत्पादन तसेच शेती व गोशाळेस भेट देऊन माहिती जाणून घेतली.
सुप्रिया ताई सुळे, रोहिणी ताई खडसे यांनी चरख्यावर सुतकताई केली, यावेळी आश्रमाच्या वतीने सुताची माळ घालून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या महात्मा गांधीजींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. खरा भारत गावागावात, खेड्यापाड्यात वसला आहे, हे जाणून ‘खेड्याकडे चला’ अशी हाक देऊन. वर्ध्या जवळ ‘ सेगाव’ हे गांधीजींनी आपल्या वास्तव्यासाठी निवडले. सेगाव कालांतराने ‘सेवाग्राम’ म्हणजेच सेवेचे गाव झाले. सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींजी यांची साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वावरील जीवनशैलीचे दर्शन घडते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे. आचार्य विनोबा भावे यांनी गीताई, भूदान चळवळ, सर्वोदय चळवळ, महात्मा गांधी तत्त्वदर्शन, वेद-उपनिषदांचे व्यासंगी चिंतन, सामूहिक साधना, जगण्याचे विविध प्रयोग, वैज्ञानिक भूमिकेतून भारतीय तत्त्वज्ञानाची मांडणी केली. त्यांची वृत्ती आध्यात्मिक आणि दृष्टी वैज्ञानिक होती. म्हणूनच ते आधुनिक ऋषी म्हणून उदयास आलेले सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या या दोन्ही महान विभूतींचे आचार विचार कायम प्रेरणादायी आहेत असे ॲड. रोहिणी खडसे यांनी सांगितले. यावेळी माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशध्यक्ष मेहबूब भाई शेख, पवनार आश्रमाचे गौतम बजाज, उषा दिदी, समीर देशमुख, किशोर माथनकर, सुनील राऊत, अतुल वंदिले, नितीन देशमुख, संदीप भांडवलकर, प्रशांत भोयर, सूरज वैद्य, आश्रमाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते