जळगाव मीरर | १ फेब्रुवारी २०२६
केंद्रीय अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे भारतीय शेतीला भविष्योन्मुख दिशा मिळाली असून, आता या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी व्यक्त केले आहे.
देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे नमूद करत जैन म्हणाले की, ही बाब लक्षात घेऊन अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ‘भारत विस्तार AI एग्री टूल’ची अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक ठरू शकतात.
बदलत्या हवामान परिस्थिती, उत्पादनातील जोखीम आणि बाजारव्यवस्थेतील अनिश्चितता लक्षात घेता, शेतीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने त्या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल त्यांचे स्वागत करायला हवे, असेही ते म्हणाले.
नैसर्गिक आपत्ती आणि उत्पादनातील जोखमी वाढत असताना पीक विमा योजनेत मूलभूत सुधारणा करण्याची गरज होती, तीही सरकारने ओळखल्याचे जैन यांनी सांगितले. एकूणच या अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राला आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि भविष्योन्मुख बनवण्याचा प्रयत्न दिसून येतो. मात्र, धोरणे कितीही चांगली असली तरी त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी झाली, तरच खऱ्या अर्थाने कृषी विकासाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास अशोक जैन यांनी व्यक्त केला.





















