जळगाव मिरर | २० मार्च २०२४
देशात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु झाली असून त्यापूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात चांगल्याच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या होत्या. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवार यांना आव्हान देत त्यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी देखील त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. मात्र, आरोप प्रत्यारोपात शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील राजकारणात चांगलाच चर्चेचा विजय ठरला. आता या लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांना पाण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांनाच लोकसभा निवडणूक लढण्याची खेळी अजित पवार यांनी आखली होती. मात्र, नाना पाटेकर यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे आता या मतदारसंघात शिवाजी आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन उमेदवार अमोल कोल्हे यांनी बाजी मारली होती. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी अजित पवार यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या सोबत असल्याने अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी चंग बांधला आहे.
अभिनेते अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवारीसाठी अजित पवार यांनी नाना पाटेकर यांना विचारणा केली होती. मात्र, नाना पाटेकर यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे, त्यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिला असल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे आता अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील. त्यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार शर्तीचे प्रयत्न करत असून अमोल कोल्हे यांनी दिलेले आव्हान त्यांनी स्वीकाराले आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी आता चंग बांधला असल्याचे दिसून येत आहे.
