
जळगाव मिरर । २४ नोव्हेंबर २०२५
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील एका २४ वर्षीय तरुणाचा दि. २० रोजी आंघोळ करतांना अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरुड येथील रहिवासी मयूर नरेंद्र पाटील (वय २४) हा दि. २० रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला होता. मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील तो बाहेर न आल्याने बाथरूमचा दरवाजा तोडला असता मयूर आतमध्ये पडलेला दिसला त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले होते. शिरुड ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र राजाराम पाटील यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अभ्यासात हुशार व मनमिळाऊ असल्याने त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




















