जळगाव मिरर । ७ नोव्हेंबर २०२५
शहरातील एस.टी. वर्कशॉप परिसरात राहणाऱ्या सुनिल संतोष पवार (वय ४९, रा. कृष्णा पुरी, पाचोरा, ह.मु. एस.टी. वर्कशॉप) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवार सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मूळचे पाचोरा कृष्णपुरी येथील रहीवासी असलेले सुनिल संतोष पवार सद्या एस. टी. वर्कशॉप येथे वास्तव्यास होते. सुनिल पवार यांनी रात्री सर्व कुटुंब झोपलेले असताना घराच्या दुसऱ्या खोलीत गळफास घेतला. बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजता सुनिल पवार यांच्या पत्नीच्या ही बाब लक्षात आली. त्यांना पाहताच त्यांनी हंबरडा फोडला.
परिसरातील नागरिकांच्या मदतीने सुनिल पवार यांना खाली उतरवून, त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मयत घोषित केले. सुनिल पवार यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रमेश चौधरी हे करत आहेत.



















