जळगाव मिरर | २३ जून २०२५
शेतामधील खांबाजवळ शिडी लावून काम करीत असलेले कैलास भिकाजी महाजन (वय ५२, रा. गणेशवाडी) हे शिडीवरुन खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या छातीला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. २२ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारामधील शेतात घडली.
सविस्तर वृत्त असे कि, गणेशवाडी परिसर कैलास महाजन हे वास्तव्यास असून त्यांचे घराजवळ टेन्ट हाऊस आहे. तसेच त्यांची शिरसोली शिवारात शेतजमीन आहे. रविवारी दुपारच्या सुमारास शेतातील एका खांबाजवळ शिडी लावून काम करीत होते. त्यावेळी शिडीवरून ते खाली पडले व त्यांच्या छातीला आणि बरगड्यांना मार लागला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. बराच वेळ ते व्यवस्थित बोलतही होते. मात्र नंतर अचानक प्रकृती खालावली आणि उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
