जळगाव मिरर | १ एप्रिल २०२४
मुंबई शहरातील सांताक्रूझमधील एका शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षाच्या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर शाळेतील ३९ वर्षीय शिपायाने ४ महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलीला चालता येत नसल्याने आईने तिला रुग्णालयात नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, सांताक्रूझ पोलिसांनी आरोपी नराधम शिपायाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, खार पूर्वेकडील गोळीबार रोड परिसरात कुटुंबासोबत राहत असलेली आठ वर्षीय पीडित मुलगी सांताक्रूझमधील एका शाळेत शिकते. या शाळेतील ३९ वर्षीय शिपायाची या मुलीवर वाईट नजर पडली. त्याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या मुलीला शाळेच्या जिन्याच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत नेत तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणाकडेही वाच्यता केली तर, तिच्यासह तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी आरोपी शिपायाने दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. त्यामुळे आरोपीने त्याचा गैरफायदा घेत सलग चार महिने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीने विरोध केल्यास तो तिला मारहाणसुद्धा करायचा.