जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२४
भरधाव चारचाकीने धडक दिल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले ६९ वर्षीय वृद्ध हे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री नशिराबाद येथे झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल हमीद शेख ईस्माईल (६९, रा. नशिराबाद) असे मयत प्रौढाचे नाव आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, पेंटर असलेले अब्दुल हमीद शेख ईस्माईल हे गुरुवारी रस्त्याच्या कडेला उभे होते. (केसीएन) त्यावेळी जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यानंतर चालक न थांबता वाहनासह पसार झाला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी चारचाकीचा पाठलागही केला, मात्र तो सापडला नाही. अपघातग्रस्तास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. धडक देणाऱ्या कारवर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी रुग्णालयात केली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.