जळगाव मिरर । ३० नोव्हेबर २०२२
जळगाव महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांची अवघ्या सात महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी परभणीचे देवीदास पवार यांची मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून मनपाला प्राप्त झाले आहेत. विद्या गायकवाड यांच्याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यात आमदार सुरेश भोळे व महापौर जयश्री महाजन यांनी देखील आयुक्तांच्या कामकाजाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
गेल्या काही महिन्यांपासूनच मनपा आयुक्त विद्या गायकवाडांकडून देखील शासनाकडे बदलीसाठी प्रस्ताव देण्यात आले होते. अखेर त्यांची बदली झाल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. देवीदास पवार यांनी बुधवारी तातडीने मनपाचा पदभार घेवून रुजू होण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. पवार हे काही महिन्यांपूर्वी परभणी महापालिकेचे आयुक्त होते. त्यानंतर त्यांची बदली अमरावती महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली होती. मात्र, त्याठिकाणी ते रूजू झाले नव्हते. दरम्यान, याबाबत विद्या गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो टोत शकला नाही. गायकवाड यांच्या कारभारावर अधिकारी व कर्मचारी देखील नाराज होते.
