जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२४
सीएसआर फंड प्राप्त करून शेततळ्याचे कामे मिळवून देतो असा बनाव करून अजय भागवत बढे यांची ४५ लाख रुपयात फसवणूक केली. याबाबत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार तक्रारदार अजय बढे यांनी मंगळवारी तक्रार दिली. त्यानुसार तापी पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व अन्य ७ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचे शेततळ्यांचे काम केले जात आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यापूर्वी निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजय बढे यांना शेततळ्याचे कामाचे टेंडर मिळवून देतो असे सांगून तक्रारदार अजय बढे यांची ४५ लाख रुपयांत फसवणूक केली होती.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय बढे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक राजकुमार यांची भेट तक्रार केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी सदर तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. मात्र, या प्रकरणी फक्त दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे अजय बढे यांना कळविले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या निर्णयाविरुद्ध अजय बढे यांनी जळगाव येथील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने सर्व पुरावे लक्षात घेवून व्ही. डी. पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी अपर जिल्हा न्यायाधीश न्या. एस. आर. पवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर अपर जिल्हा न्यायाधीश न्या. एस. आर. पवार यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णय कायम ठेवून निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामानंद नगर पोलिसांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशाने अजय बढे यांची मंगळवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, सूर्या चौहान, सनदी लेखापाल सुहास भट (मुंबई), व्ही. के. जैन, पवन कोलते, ललित चौधरी, पंकज नेमाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.