जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३
वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हातसफाई केली. ही घटना आव्हाने शिवारातील संत सावतानगरात घडली. त्यांच्या घरातून चोरट्यांनी रोख १० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आव्हाणे शिवारातील संत सावतानगरात रत्नाबाई पाटील या वास्तव्यास असून दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता घराला कुलूप लावून जळगावातील राजनगर येथे वडिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप, कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख १० हजार रुपये, सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. दि. १८ रोजी रत्नाबाई पाटील घरी आल्या त्या वेळी हा प्रकार समजला. त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.