जळगाव मिरर | १५ मार्च २०२४
लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आता जवळपास निश्चित होत असतांना दोन दिवसात महाविकास आघाडीचे उमेदवार देखील जाहीर होणार आहे. त्यामुळे आतापासून राजकीय नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता थेट शरद पवार गटाचे खा.सुप्रिया सुळे यांनी महायुतीतील पक्षांना इशारा दिला आहे.
खा.सुळे म्हणाले कि, बारामती हा माझा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघात कोणी दमदाटी केली तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा त्यांनी अजित पवार गटाला दिला आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांना कुणी शिव्या घातल्या तर मी ढाल बनून उभी राहीन. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी स्वतः पत्राद्वारे केला होता. यावरूनच सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”आजनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुणीही आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर त्यांना सांगायचे आधी सुप्रिया सुळेंना धमकी दे, मग माझ्याशी बोल. कुणीही शिवीगाळ करायची नाही. सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. जसा चढ असतो तसा उतारही असतो”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बारामती हा माझा मतदारसंघ आहे. मी इथली खासदार आहे. त्यामुळे इथे कोणीही दमदाटी करायची नाही. कोणीही धमकी द्यायची नाही. नाही तर गाठ माझ्याशी आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या ”भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष एकमेकांवर असे हल्ले करतात, हर्षवर्धन पाटलांना शिव्या घातल्यात, ही इंदापूर आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे?, एका मित्रपक्षाचा नेता दुसऱ्या मित्रपक्षाच्या नेत्याला शिवीगाळ करतो. हर्षवर्धन पाटील यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगावे लागले”, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीला लगावला आहे.
