जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरातून धक्कादायक घटना समोर येत असतांना नुकतेच धुळे शहरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे शहराजवळ असलेल्या नगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील एका चहाच्या हॉटेलजवळ एक तरुणी जळालेल्या अवस्थेत आवाज देत हाेती. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. रुग्णालयात दाखल केल्यावर दुपारी २ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्याजवळ असलेल्या बॅगमधील माेबाइल आणि आधार कार्डवरून तिची ओळख पटली.
सविस्तर वृत्त असे कि, इंदूर येथील रक्षिता पाटीदार ही तरुणी पुण्यात एका कंपनीत नाेकरीला हाेती. रक्षाबंधन आणि २० ऑगस्टला वाढदिवस असल्याने ती खासगी ट्रॅव्हल्सने घरी निघाली हाेती; परंतु इंदूरऐवजी सकाळी ६.३० वाजता ती धुळ्यात बसमधून उतरली. त्यानंतर सकाळी महामार्गावरील एका पेट्रोल पंपावरून तिने बाटलीत डिझेल खरेदी केले. त्यानंतर तिने महामार्गावरच पेट्रोल पंपापासून ५०० मीटर अंतरावर स्वत:ला जाळून घेतले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मुंबई-आग्रा महामार्गावर एका थांब्यावर ट्रॅव्हल्स थांबल्यानंतर त्यातून इतर प्रवाशांसाेबत रक्षिता खाली उतरली. कंपनीचे काम असल्याने इंदूरऐवजी धुळ्यात उतरत असल्याचे तीन वाहकाला सांगितले हाेते. सकाळी ११ वाजता तिचे वडील इंदूर येथे थांब्यावर येऊन थांबले हाेते. ती फाेन उचलत नाही आणि ट्रॅव्हल्समध्येही नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा शाेध सुरू केला. अशातच सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या माेबाइलवर रक्षिताच्या माेबाइलवरून फाेन आला आणि त्यांना ती कुठे आहे ते कळले. तिला वाचवणाऱ्या नागरिकांनी तिच्या बॅगेतून माेबाइल काढला, त्याला लाॅक पॅटर्न नसल्याने त्यांना लगेच फाेन करता आला.
प्रत्यक्षदर्शीच्या मते रक्षिताचा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हॉटेलच्या मागे काही अंतरावरून आवाज आला. त्यामुळे लोक आवाजाच्या दिशेने धावले. त्या वेळी ती जळत असताना दिसली. काही वेळात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, कर्मचारी पिंपळे आले. दुपारी सव्वा वाजता तरुणीला अत्यवस्थ स्थितीत हिरे रुग्णालयात दाखल केले. तिच्या बॅगमध्ये आधार कार्ड व ओळखपत्र हाेते. त्यावर रक्षिता पाटीदार (वय २४, रा. मॉडेल भवन, अन्नपूर्णा सेक्टर, अन्नपूर्णा मंदिराजवळ, सुदामानगर, इंदूर, मध्य प्रदेश) असा पत्ता होता. त्यानंतर पोलिसांनी इंदूर पोलिसांच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. उपचार सुरू असताना दुपारी अडीच वाजता रक्षिताचा मृत्यू झाला. दरम्यान, रक्षिताचे वडील महेश पाटीदार यांनी सांगितले की, सकाळी ११ वाजेपासून रक्षिताचा शोध सुरू होता. दुपारी तिच्या फोनवरून कॉल आल्यावर घटनेची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.