जळगाव मिरर | २१ जून २०२४
जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून राज्याचे माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशावर जोरदार चर्चा सुरु असून आज पुन्हा एकदा आ.खडसे व नवनिर्वाचित खा.खडसे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून श्री. खडसे भाजप मंत्र्यांसोबत भेटीगाठी करीत होते. आज त्यांनी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली.
आ. एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश घेण्याची प्रयत्नात आहे. आपण लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटले त्यांनी आधीच सांगितले होते. मात्र अद्याप त्यांचा हा पक्ष प्रवेश झालेला नाही. यानंतर त्यांचा प्रवेश नेमका कधी होणार? याबाबत गोंधळाची स्थिती होती.
विशेष बाब म्हणजे मध्यंतरी त्यांनी आपण पक्षात आधीच प्रवेश घेतलेला असून येत्या काही दिवसांमध्ये याची पुरावे जगासमोर मांडणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर त्यांची सुन खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यामुळे पक्ष प्रवेश सोहळा लवकर होणार असल्याची चर्चा सुरू होती. परिणामी एकनाथराव खडसे यांची भाजपमध्ये घरवापसी झाल्यास उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार हे निश्चित आहे. आता हा पक्षप्रवेश कधी होतो याची उत्सुकता लागली आहे.