जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२४
सध्या सर्वत्र अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट जोरदार सुरु असतांना नुकतेच ‘पुष्पा 2’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी आज अटक केली. अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये आला होता, त्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर गांधी हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं.
अल्लू अर्जुन पुष्पा 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी थिएटरमध्ये आला, त्यावेळी एकच गोंधळ, धावपळ सुरु झाली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तिच्यासोबत आलेला मुलगा गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा नोंदवला व नंतर त्याला अटक केली.
अल्लू अर्जुनने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. अभिनेत्याने हाय कोर्टात याचिका दाखल करुन तात्काळ सुनावणीची मागणी करुन पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केलीय. न्यायालयाने अल्लू अर्जुनची याचिका स्वीकारली आहे.