जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२५
जिल्ह्यात नगर परिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक १ डिसेंबर रात्री 10.05 वाजेपासून तर दिनांक ३ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (२) नुसार जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या आदेशाद्वारे नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५ चे मतदान तसेच मतमोजणी सुरळीत, शांततेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहून पार पाडण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन वरील आदेश पारित केले आहेत. मतदान केंद्र परिसरात अनधिकृत जमाव, मोर्चा, प्रचार पाच पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविणा-यावर एकत्रितपणे वावरण्यांवर सदर आदेशान्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर आदेश हा निवडणूक कामी नियुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना लागू होणार नाही, असेही आदेशात नमुद केले आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणतीही गैरप्रकार अथवा अपप्रचारात्मक कृती टाळावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





















