जळगाव मिरर | १४ मार्च २०२५
गेल्या आठवड्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील खोक्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रयागराज येथून खोक्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरावर वन विभागाने बुलडोझर चालविला. अमानुष मारहाण प्रकरणात तीन गुन्हे दाखल असलेल्या सतीश भोसलेला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अटक केली होती. त्याला आणण्यासाठी बीड पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी तेथे पोहचले. ट्रान्झिट रिमांड घेऊन बीडचे पथक सतीश भोसलेसह बीडकडे रवाना झाले. दरम्यान, खोक्याला मुंबईहून संभाजीनगर येथे विमानाने आणण्यात आले. येथून पोलिस त्याला घेऊन बीडकडे रवाना झाले. पोलिसांनी त्याला शिरूर येथील रुग्णालयात दाखल केले असून या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ढाकणे पितापुत्राला मारहाण, घरात आढळलेला गांजा या प्रकरणातदेखील गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर यासह इतर ठिकाणी त्याने प्रवास केला. संभाजीनगरहून तो थेट प्रयागराज येथे पोहचला होता. त्याचे लोकेशन मिळताच बीड पोलिसांनी प्रयागराज पोलिसांशी संपर्क साधत त्याला त्याच ठिकाणी अटक केली. यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन हे पथक बीडकडे निघाले.
सतीश भोसले उर्फ खोक्या याने वनविभागाच्या जागेत अनाधिकृतरित्या घर बांधले होते. त्याच्या घरावर गुरुवारी दुपारी वनविभागाने बुलडोजर चालवला. यावेळी वनविभाग, महसूल व पोलिस अधिकार्यांसह चाळीस कर्मचारी उपस्थित होते. जवळपास चार तास ही कारवाई चालली. खोक्याच्या घराची झडती घेतली असता शिकारीसाठी लागणारे साहित्य व वाळलेले मांसदेखील जप्त करण्यात आले होते.
त्याचे घर वनविभागाच्या जागेवर असल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली होती. त्याने त्याचा समाधानकारक खुलासा न केल्याने गुरुवारी त्याच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला. दुपारी त्याच्या घरातील साहित्य बाहेर काढण्यात आले व नंतर बुलडोझरने बांधकाम पाडण्यात आले. या ठिकाणाहून साहित्य जप्त करण्यात आले असून, पुढील्ल कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांनी सांगितले.