जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील झालं आहे. आता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम राहिला आहे. तो कार्यक्रमही पुढच्या दोन-चार दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागाच्या कामे हाती घेत आहेत. असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असावं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या भेटीनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण महाराष्ट्रातील बडा नेता आणि देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा राजकीय चर्चा न होणं हे शक्यच नाही. त्यामुळे या भेटीला जास्त राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.
“खरं म्हणजे ही भेट कुठलीही राजकीय नव्हती. सदिच्छा भेट होती. सरकारने केलेल्या कामांची पोचपोवती महाराष्ट्राची जनता देईल. तशी पोचपावती महाराष्ट्राच्या जनतेने दिली म्हणून तशी सदिच्छा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली. मोदींनी सुद्धा सांगितलं की, महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही. केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण जसे आपल्या पाठिशी उभे होतो तसे यापुढे देखील पाठिशी आहोत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री किरण रिज्जू यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होत होती. अडीच वर्षात आम्ही लोकाभिमुख सरकार काय असतं ते दाखवलं आणि लोकांनी आम्हाला मान्यता दिली. केंद्र सरकारचं आमच्यामागे पाठबळ उभं होतं. आता आमची नवीन इनिंग सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कसा होईल? याचा विचार करु. महाराष्ट्रात क्षमता आहे. केंद्रातील अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सर्वांची भेट घेणार आहोत”, अशी देखील माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.