जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. यात काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांची देखील नाराजी दूर करत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच नांदेड येथील भाजपचे जुने कार्यकर्ते डॉ. अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्याचवेळी त्यांना राज्यसभेचे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण यांचे नाव राज्यसभेचे उमेदवारीच्या यादीत समोर आले आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा एक मोठा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. अशोक चव्हाण यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना आगामी मंत्रिमंडळात मोदी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येईल, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांना आमदारकीचे तिकीट नाकारण्यात आल्यामुळे त्या नाराज होत्या. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या बातम्या वारंवार समोर आल्या आहेत. मात्र, मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन लवकरच होईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यानुसार त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.