जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२५
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्यात युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुढील एक ते दोन दिवसांत या युतीबाबत मोठी बातमी मिळेल, असा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत महापालिका निवडणुकीत युतीच्या शक्यतेवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. बैठकीला दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी युतीबाबत सकारात्मक संकेत दिले. युतीची अधिकृत घोषणा कधी करायची, याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते मिळून घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. “युतीची तारीख लवकरच कळवली जाईल. सध्या सर्व बाबी चर्चेत आहेत. अंतिम निर्णय झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती दिली जाईल,” असे परब म्हणाले.
दरम्यान, मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्याच्या प्रश्नावर अनिल परब यांनी सावध भूमिका घेतली. “काँग्रेसबाबत सध्या काही बोलणे योग्य ठरणार नाही. आम्ही आजही महाविकास आघाडीचा भाग आहोत आणि ती अभेद्य राहावी, अशी आमची इच्छा आहे. अंतिम निर्णय झाल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट केल्या जातील,” असेही त्यांनी नमूद केले.
ठाकरे बंधूंमधील संभाव्य युतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत होणाऱ्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















