
जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२५
राज्याचे मंत्री आणि भाजप नेते अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना आज (दि. २० सप्टेंबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर येथील त्यांच्या कार्यालयासमोर घडली. या घटनेत गाडीच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले असून, पोलिसांनी एक मनोरुग्ण तरुण ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री सावे आपल्या कार्यालयात असताना, कार्यालयासमोर उभी असलेल्या त्यांच्या गाडीवर एका अज्ञात तरुणाने अचानक दगड फेकला. या दगडफेकीमुळे गाडीच्या समोरील भागाला थोडेसे नुकसान झाले. घटनेनंतर तत्काळ उपस्थित नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
अतुल सावे यांच्या ड्रायव्हरने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संबंधित तरुण हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात पाठवण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, मंत्री सावे कार्यालयातून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच ही घटना घडल्याने काही काळासाठी परिसरात खळबळ उडाली. अद्याप मंत्री सावे यांनी याप्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकारामुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




















