जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२५
मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. याचदरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आज शिवतीर्थवर या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
अलिकडेच गणेशोत्सवामध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब गेले होते. गणपतीनंतर उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ते शिवतीर्थवर आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब देखील आहेत.विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची महिती समोर येत आहे. गेल्या 40 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. यावेळी त्यांच्या दसरा मेळाव्याबाबत देखील चर्चा होऊ शकते, असेही म्हंटले जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्याविषयी चर्चा झाली होती. त्यावर काँग्रेस पक्षाने सावध भूमिका घेत आम्ही दिल्लीतील हायकमांडला विचारु, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.