जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२४
अवैध वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस दलाकडून कारवाई करण्यात आली. एकाच रात्री पोलीस दलाने जिल्हाभरात केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ६४ ट्रॅक्टर, १७ डंपर, ४ जेसीबी जप्त केले. वाळू उपसा व वाहतुकीसाठीच्या या वाहनांसह ४ चारचाकी वाहन, ३ रिक्षा व ४५ दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कालिका माता चौकामध्ये पाच दिवसांपुर्वी एका वाळूच्या डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून देत ठिय्या आंदोलन केले होते. वारंवार वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकांचे बळी जात असल्याने वाळू वाहतुकीविरुद्ध नागरिकांचा रोष वाढतच आहे. त्यामुळे अवैध वाळूविरुद्ध पोलिस दलाकडून कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी, दुय्यम अधिकारी, अंमलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शुक्रवारी रात्रभर कारवाई करण्यात येऊन मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध वाळूविरुद्ध कारवाईसाठी जिल्ह्यात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी, पेट्रोलिंग करण्यासह जागोजागी फिक्स पॉईंट लावण्यात आले. यातून वाळू तस्करांवर लक्ष ठेवून ६४ ट्रॅक्टर, १७ डंपर, चार जेसीबी, पाण्यातून वाळू काढणारे एक मशिन जप्त केले. तसेच चार चारचाकी वाहने तीन रिक्षा व ४५ दुचाकींवर कारवाई करुन त्या जप्त करण्यात आल्या आहे. अवैध वाळूविरुद्ध कारवाई करताना वाहने जप्त करण्यासह वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १३ जणांना अटक करण्यात आले. वाळू चोरीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
वाळू चोरीविरुद्ध कारवाई मोहीमेमध्ये वरील कारवाईव्यतिरिक्त सात दिवसात एकूण २१ जणांविरुद्ध १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून २२ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या शिवाय १६ ट्रॅक्टर, डंपर, चारचाकी, दुचाकी असा एकूण ५६ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.