जळगाव मिरर | ८ जुलै २०२३
राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचे अजित पवार सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज मोठा धक्का बसला आहे. थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच ठाकरे गटाच्या १४ आमदारांनाही म्हणणं मांडण्यासाठी नोटीस धाडण्यात आलेली आहे.
शिवसेनेच्या ४० आमदार व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली असून विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आलीय. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झालेली असून शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचा प्रतोद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांचा व्हिप लागू होईल, ने स्पष्ट आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल असलेली आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका निकाल काढण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ठाकरे गटातून शिंदेंकडे गेलेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधान सभा अध्यक्षांनी विशिष्ट वेळेत याचिका निकाली काढणं बंधनकारक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह १५ आमदारांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे.
