जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय घेतला होता. नुकतेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, असे आदिती तटकरे म्हणाल्या. काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनोचा लाभ घेता येणार आहे. सध्या सरसकट छाननी होणार नाही. केवळ स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या अर्जाबाबत तक्रार दिली केवळ त्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
आपण कुठेही विनातक्रार लाभार्थ्यांची पडताळणी करणार नाहीत. मात्र, उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखांच्या पुढे लाभार्थ्याचे उत्पन्न गेले असेल, तर ती महिला योजनेसाठी पात्र राहणार नाही. काही महिलांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन अर्ज केले होते. काही महिलांचे लग्नानंतर राज्याबाहेर स्थलांतर झाले आहे. चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल, त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल. तसेच आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार योजनेसाठी पात्र असणार नाहीत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.