जळगाव मिरर | १० एप्रिल २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून जीव घेतल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर स्वतःने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) येथील दत्तनगर परिसरात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमरास घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, प्रतिभा हेमंतकुमार मोहिते, (वय- 36, सध्या रा. दत्तनगर, थेऊर, ता. हवेली मूळ रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी या महिलेच्या भावाने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ३५ वर्षांच्या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
टेस्ट ट्युब बेबीकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च करून दोन जुळी मुले झाली. मात्र, त्यांची वाढ योग्यरीत्या होत नसल्याच्या तणावापोटी आईने दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत बुडवून जिवे मारले. मुल होत नसल्याने त्यांनी मोठा खर्च करून टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय निवडला. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्या माहेरी दत्तनगर थेऊर येथे आल्या होत्या.
या बाळंतपणात महिलाही खूप अशक्त झाली असून, त्यांना काही आजार झाला आहे. टाकीमधील पाण्यात दोन्ही बाळांना बुडविले व स्वतः त्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, टाकीचे तोंड लहान असल्याने व पाणी जास्त असल्याने टाकीच्या आत प्रतिभा मोहिते या पाण्यात बुडाल्या नाहीत. दोन तीन वेळेस टाकीतून डोके वरती आल्याने समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने टेरेसवरून हा प्रकार पहिला आणि महिलेचा जीव वाचला.
मुलांना नागरिकांच्या मदतीने वानवडी येथील कमांड हॉस्पिटल येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.