जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२४
गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार मुकेश दलाल यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरला. त्यातच बसप व इतर पक्ष तथा ४ अपक्ष असे मिळून ८ उमेदवारांनी आश्चर्यकारकपणे शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे दलाल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील भाजपचा हा पहिलाच विजय ठरला आहे.
सुरतचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी भाजपचे उमेदवार मुकेश कुमार चंद्रकांत दलाल यांना बिनविरोध निर्वाचित झाल्याचे जाहीर करून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. सुरतमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नीलेश कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जासोबतच्या नामांकन प्रस्तावकांच्या स्वाक्षरीमध्ये विसंगती आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर, मैदानात उतरलेले पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज रद्द करण्यात आला. याशिवाय रिंगणातील ४ अपक्ष तीन विविध लहान पक्षांचे उमेदवार व बसपचे प्यारेलाल भारती यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आश्चर्यकारकपणे माघार घेतली. त्यामुळे कुंभाणी यांना विजयी घोषित करण्यात आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागांसाठी येत्या ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणे प्रस्तावित आहे. परंतु, सुरत मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे राज्यात उर्वरित २५ जागांवरच निवडणूक होणार आहे.