जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२५
तब्बल २७ वर्षापासून भाजप पाहत असलेले स्वप्न आज शनिवारी साकार होत आहे. भाजपने दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ मतदारसंघात विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ‘आप’ला केवळ २२ मतदारसंघात विजय मिळाला असून काँग्रेसची दुर्वास्था कायम राहिली आहे. राजधानीच्या निवडणुकीत काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा भोपळा फोडता आला नाही. यासोबतच आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राजधानी दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी, बुधवारी मतदान झाले. यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी सर्व जागांचे निकाल जाहीर केले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, भाजपला दिल्लीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बहुमतासाठीचा ३६ जागांचा आकडा पार करत ४८ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. यामुळे केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपचा दिल्लीतील सत्तेचा दुष्काळ संपला आहे. आम आदमी पक्ष दिल्लीत मागच्या १२ वर्षांपासून सत्तेत आहे. त्याअगोदर सलग तीन वेळा म्हणजे जवळपास १५ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. यामुळे जवळपास तीन दशकांपासून भाजपला राजधानीत सत्तेसाठी संघर्ष करावा लागला आहे. दुसरीकडे सलग ३ वेळा दिल्लीच्या सत्तेत राहणारा काँग्रेस पक्ष मागच्या सलग ३ निवडणुकींमध्ये भोपळा फोडू शकला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदरीची घोर निराशा यावेळेसही कायम राहिली आहे. मात्र, मागच्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली आहे.
यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ४ हजार ८९ मतांनी भाजपच्या प्रवेश सिंह वर्मा यांनी पराभव केला. केजरीवाल यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना ४ हजार ५६८ मते मिळाली आहेत. जंगपुरा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा ६७५ मतांनी पराभव झाला असून या मतदारसंघात भाजपचे तरविंदर सिंह मारवाह विजयी झाले आहेत. तसेच ‘आप’चे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांचा ३ हजार १८८ मतांनी पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजपच्या शिखा रॉय विजयी झाल्या आहेत.