
जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२४
राज्यात शिंदे व फडणवीस, अजित पवार यांचे सरकार असतांना कल्याण शहरात भाजपच्या एका आमदाराने थेट सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर आता शिंदे व फडणवीस यांच्या सरकारवर विरोधक टीकास्त्र सोडू लागले असतांना आता त्या गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी २ फेब्रुवारी मध्यरात्री कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. आता पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराचा धरारक व्हिडिओ समोर आला आहे. महेश गायवाड पोलीस स्थानकात थांबले असतानाच त्याच्यावर अचानक गोळीबार सुरू झाला आणि एकच गोंधळ उडाला. महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांना गोळ्या लागल्या होत्या. यात महेश गायकवाड गंभीर जखमी होऊन खाली पडताना दिसत आहेत. खाली पडल्यानंतरही त्यांच्यावर गोळीबार आणि मारहाण होताना दिसत आहे.