
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सत्ताधारी भाजपला इशारा देताना, “भाजपची काँग्रेस होऊ लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 10 भाजप उभ्या करू शकतो,” असे स्पष्ट विधान केले. तसेच “आम्हाला कुणी हरवू शकत नाही” या अहंकारात भाजपने राहू नये, असेही त्यांनी म्हटले.
नागपूर येथील रेशीमबागमधील महर्षी व्यास सभागृहात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित रामस्मरण व्याख्यानमालेत ते बोलत होते. “भारत एक हिंदू राष्ट्र” या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.
पोंक्षे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक करत, “आज हिंदू धर्माला चांगले दिवस आले आहेत,” असे म्हटले. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी, “काँग्रेसच्या आंदोलनामुळे देशाचे भले झाले नाही,” असा दावा केला.
धार्मिक विषयावर बोलताना त्यांनी मनुस्मृती जाळणाऱ्यांवर टीका केली. “मनुस्मृती न वाचताच जाळली जाते. ती वाचली असती तर जाळण्याचा प्रश्नच आला नसता,” असे ते म्हणाले. हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्राचीन ज्ञानाचा मोठा साठा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच “भारत हा हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहील. मात्र आता अधिकृतरित्या भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावा,” अशी मागणी त्यांनी केली. संघाच्या भूमिकेबाबत बोलताना पोंक्षे म्हणाले की, “संघाने अनेक संकटांचा सामना करून आपली ताकद सिद्ध केली आहे. गरज पडल्यास संघ अशा 10 भाजप उभ्या करू शकतो.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.





















