जळगाव मिरर | 31 ऑगस्ट 2026
बोदवड तालुक्यातील साळशिंगी शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीने झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

मिळाळलेल्या माहितीनुसार, साळशिंगी शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था कुजलेली असल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा आपल्या परिचयातील व्यक्ती बेपत्ता असल्यास त्यांनी तातडीने बोदवड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत आहेत.




















