जळगाव मिरर | ८ जुलै २०२५
अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी एकीकरण समितीने काढलेल्या आजच्या (दि.८ जुलै) मोर्चात आमदार प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. पण ते मोर्चात सहभागी होताच त्यांच्या विरोधात, मोर्च्याकडून ‘गो बॅक’ची नारेबाजी करण्यात आली. ‘५० खोके, एकदम ओके’च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. सरनाईक यांच्या अंगावर बाटली फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी धक्काबुक्कीही झाली. यानंतर प्रताप सरनाईक यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला. हा मोर्चा मीरा रोडवरील रेल्वे स्टेशनजवळ आहे. येथे मोठी गर्दी पाहायला मिळाली.
एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मीरा रोडवर मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी एकीकरण समितीने आज मंगळवारी मीरा रोडवरुच मोर्चा काढला. पोलिसांनी या मार्गावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली. तरीही ठरलेल्या मार्गानेच मोर्चा निघाला. दरम्यान, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. या कृतीचा ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निषेध नोंदवला.
”मी स्वतः मीरा भाईंदरला मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असून पोलिसांची हिंमत असेल तर मला अडवून दाखवावं,” असे आव्हान प्रताप सरनाईक यांनी दिले. त्यानुसार ते मोर्चात सहभागीही झाले. पण त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ते मोर्चातील गर्दीत असताना त्यांच्या दिशेने एक पाण्याची बाटलीही फेकली. यामुळे ते मोर्चातून बाहेर पडले.
मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी, ‘तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर मोर्चाला परवानगी द्या’ अशी भूमिका स्पष्ट केली. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली जाते. आम्हाला का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते आम्हाला म्हणतात घोडबंदरला मोर्चा काढा. मीरा-भाईंदरला घटना घडली आणि मोर्चा घोडबंदरला… उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा. मी मार्ग बदलायला तयार होतो. मात्र मीरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढायला सांगणार असाल तर हे आम्ही सहन करणार नाही. याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायचीच नव्हती. पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का हा आम्हाला संशय आहे. जर आमचा शांतपणे मोर्चा होता. तर परवानगी का दिली नाही? असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देत असाल तर सरकार गुजरातचे आहे की महाराष्ट्राचे? हा आमचा प्रश्न आहे, असेही ते पुढे म्हणाले.
