जळगाव मिरर | १३ जुलै २०२५
चाळीसगाव शहराजवळील रांजणगाव परिसरात दि.१२ रोजी सकाळी पाव विक्रीसाठी जात असलेल्या उत्तर प्रदेशातील मजुराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. परंतु, तत्काळ केलेल्या पोलीस कारवाईत संशयित आरोपीस वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, उत्तर प्रदेशातील कनोज जिल्ह्याच्या त्रिवा तालुक्यातील रुरा येथील जावेद अन्वर खान (वय ३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जावेद खान हे पाव विक्रीचा व्यवसाय करत असून सध्या ते चाळीसगावातील हिरापूर रोडवरील विश्वास बेकरीजवळ राहत होते. दरम्यान, जावेद खान हे त्यांच्या सहकाऱ्यासह पाव विक्रीसाठी सायकलवरून रांजणगाव गावाकडे जात होते. आज सकाळी सुमारे ६ वाजता फौजी ढाब्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा विंगर गाडी (एमपी ०९, एएच- ९७३३) ने त्यांच्या सायकलला जबर धडक दिली.
या अपघातात जावेद खान रस्त्याच्या बाजूला फेकले गेले व त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सकाळी ७.५५ वाजता त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी नाकाबंदी करून फरार झालेल्या गाडीचा पाठलाग केला. काही वेळातच पोलिसांनी विंगर गाडी व गाडीचालक अक्षय सुभाष ससाने (रा. देवास नाका, बापू गांधी नगर, इंदोर, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले. याबाबत मृताच्या सहकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून गाडी चालक अक्षय ससाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील जवळपास ८ ते १० पाव विक्रेते सध्या चाळीसगाव तालुक्यात विविध गावांमध्ये व्यवसाय करत आहेत.
