जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२४
मित्र पक्षांची यादी आली नसल्याने निवडणूक लढणार नसल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दि. ४ स्पष्ट केले. मित्र पक्षांची यादी आलेली नाही. एकाच जातीवर कुणी निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढणार नाही, आता उमेदवार पाडणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मराठा उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
काल दिवसभर मतदारसंघानुसार सगळ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहीन, असं जरांगे म्हणालेत.
एका जातीवर निवडणूक लढवून जातीचं हसू करून घेऊ का? राजकारण हा आमचा कुठं खानदाणी धंदा आहे… माघार घेणारी औलाद नाही आमची… एका जातीवर निवडून येत नाही, म्हणून उमेदवार देणार नाही. हा गनिमी कावा आहे. मी कालपासून सांगतोय, तिघांचं समीकरण आहे, पण यादीच आली नाही, समाजाला एक सांगणं आहे,तुमच्या मतदारसंघातल्या एकाला मदत करायचं तर करा पण त्याच्याकडून लिहून घ्या, असं जरांगे म्हणालेत.