
जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२६
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवडाभराच्या स्थिरतेनंतर पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदविली गेली आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यापासूनच सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम दीड लाखांच्या पुढे गेला तर चांदीनेही प्रति किलो अडीच लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
सराफ व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हा बाजार भाव वाढला आहे. विशेषतः अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात चढ-उतार दिसून आले, ज्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही झाला आहे.
सकाळी वाढलेले दर सायंकाळपर्यंत किंचित घटले असले तरी दागिन्यांच्या किमती उच्च पातळीवर स्थिर आहेत. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना अचानक आर्थिक नियोजन बदलावे लागले आहे. सुवर्ण बाजारपेठेतील दरांची हालचाल अशी होती: सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये प्रति १० ग्रॅम २०६ रुपयांची किंचित वाढ नोंदली गेली, ज्यामुळे दर १ लाख ५३ हजार ९८५ रुपयांपर्यंत पोहोचले होते (३% जीएसटीसह). मात्र, मंगळवारी दिवसभरात १३०९ रुपयांची घट झाल्याने दर १ लाख ५२ हजार ६७६ रुपये झाले.
बुधवारी, दि. ८ रोजी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर अचानक ५१२० रुपयांची वाढ झाली आणि दर १ लाख ५७ हजार ७९६ रुपयांपर्यंत पोहोचले. दुपारी ८२४ रुपयांची घट झाली आणि दर १ लाख ५६ हजार ९७२ रुपये झाले. सायंकाळी बाजार बंद होण्याच्या वेळी १४४२ रुपयांची घट झाली आणि दर १ लाख ५५ हजार ५३० रुपये झाले. या वाढत्या आणि घटत्या किमतींमुळे बाजारात अस्थिरता दिसून येत असून, सोनं-चांदीच्या खरेदीच्या निर्णयांमध्ये ग्राहकांचा विचार गंभीर झाला आहे.





















