जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अनेक घटनामध्ये महसूल व पोलीस विभागात लाच घेण्याचे प्रमाण वाढले असतांना नुकतेच जानेवारी महिन्याच्या अखेरीस वेअर हाऊस बांधकामासाठी परवानगी दिल्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच स्वीकारताना चोपडा तालुक्यातील देवगाव पारगावच्या ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय ३९) याला जळगाव एसीबीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धानोरा येथील 33 वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दिली होती. तक्रारदारांचे पारगाव येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदारांनी दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. संशयित आरोपी ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय 39) यांनी वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली. केलेल्या कामाचा मोबदला व बक्षीस म्हणून तक्रारदारांकडे साडेसाह हजार रुपयांची लाच मागण्यात आली व पाच हजारात तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवला.
तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला. बुधवार, 31 जानेवारी रोजी दुपारी पंचांसमक्ष लाच ग्रामसेवक सोनवणे यांनी स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.. त्यांच्याविरोधात अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन.एन.जाधव, फौजदार सुरेश पाटील, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, शिपाई राकेश दुसाने, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.