जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२५
पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबूराव लोखंडे याला जळगाव एसीबीने दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पोटखराब क्षेत्र वहिताखाली लावून देण्यासाठी मागितलेल्या 15 हजारांच्या लाचेपैकी उर्वरित रक्कम स्वीकारताना केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे महसूल खात्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कोकडी, ता. पाचोरा शिवारात असलेले क्षेत्र गाव नमुना 7/12 वर पोटखराब म्हणून नोंदवलेले होते. त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई व शेतीविषयक कर्ज मिळत नव्हते. सदर क्षेत्र वहिताखाली लावून देण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला असता सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबूराव लोखंडे (वय 37) यांनी काम करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली. सुरुवातीला तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित दहा हजार रुपये देण्यासाठी तगादा लावला. यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. दि. 9 रोजी तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आला. यावेळी लोखंडे यांनी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताच एसीबीने त्यांना बेड्या ठोकल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, शिपाई भूषण पाटील, राकेश दुसाने व अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.