जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दोन भावांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिंप्रीपंचम येथे उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत मुखा मानकू शिंदे (45, पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संशयित लहान भाऊ पंढरी मानकू शिंदे (पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यास अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालूक्यातील पूर्णाड वस्ती येथे मुखा मानकु शिंदे (वय ४५) हे आपल्या परीवारासह वास्तव्यास असून लहान भाऊ पंढरी शिंदे ( वय ४०) हा काही दिवसांपासून त्याला पैसे मागत होता मात्र पैसे न दिल्यानंत गुरुवार, 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद पिंप्री पंचम गावातील भागवत धनु यांच्या शेतामध्ये झाला. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी लहान भाऊ पंढरी शिंदे याने मोठा दगड मोठ्या भावाच्या डोक्यावर मारल्याने तो गंभीर जखमी झाला. आजुबाजूच्या लोकांनी धाव घेत त्यांचे भांडण सोडवले. जखमी मुखा शिंदे यांना दवाखान्यात हलविले. मात्र मार गंभीर असल्यामुळे त्याला मुंबई येथे मोठ्या दवाखान्यात हलवण्यासाठी सांगण्यात आले. तेथून मुंबई येथे जात असताना उपचारादरम्यान मुखा शिंदे यांचा मृत्यू झाला.