जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील जंगलात बेलाची पाने तोडण्यासाठी बहिण-भाऊ गेले होते. या वेळी बहिणीचा खाली पडलेल्या वीज तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागला. हे भावाच्या लक्षात येताच ती तार बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहूर पेठ येथील रहिवासी समाधान आनंदा मोरे (वय ३४) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. समाधान आणि त्यांची बहिण आशा (वय ३५) हे दोन्ही बहिण-भाऊ शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बेलाची पाने तोडण्यासाठी लोंढरी येथील जंगलात गेले होते. बेलाची पाने तोडत होते. त्यावेळी वीज खांबावरील तार तुटून खाली पडलेला होता. या तारेला आशा यांचा स्पर्श झाला. ही बाब समाधान यांच्या लक्षात येताच तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनाच जोरदार शॉक लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, समाधानच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजधर पांढरे, अरुण घोलप, शाम सावळे, रामेश्वर पाटील, अँड संजय पाटील, आर.बी. पाटील, रवींद्र मोरे, संदिप बेढे यांच्यासह नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती. डॉ. बोरसे यांच्या माहितीवरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.