नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून, आज गुरुवारी निर्मला सितारामन यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात युवक, महिला, शेतकरी, गरीब आदी घटक केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले. अनेक महत्वाच्या योजनांचा उल्लेख या अर्थसंकल्पात करण्यात आला. मात्र, नोकरदार वर्गाला अपेक्षित असा दिलासा मिळू शकला नाही. कररचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळं कर सवलतीसाठी नोकरदार वर्गाला येत्या काळात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन. भारताचा पाया मजबूत करणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प आहे. वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. २ कोटी नवी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांसाठीही महत्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. हा देशाच्या भविष्याचा अर्थसंकल्प आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. अर्थसंकल्पात २०४७ पर्यंत विकसित भारताची गॅरंटी आहे. त्यात विश्वास भरलेला आहे, असेही ते म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान मोदींचे मी मनापासून आभार मानतो. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. आज अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला देश जगात एक आत्मविश्वासपूर्ण देश झाला आहे, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.