जळगाव मिरर | २५ नोव्हेंबर २०२५
दुचाकीला बसचा कट लागल्यामुळे दुचाकीस्वार व चालकामध्ये वाद होऊन बस अर्धा तास रोखून धरली. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अन्य वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. हा प्रकार सोमवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुल चौकात घडला. वाद वाढत गेला व बस थेट प्रवाशांसह जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आली. या सर्व प्रकारात प्रवासी तासभर ताटकळले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते यावल ही बस (क्र. एमएच १४ एलएक्स ५०३८) बसस्थानकाकडून टॉवर चौकाकडे जाताना जिल्हा क्रीडा संकुल चौकात एक दुचाकी (क्र. एमएच १९ ईई ९१९२) तिच्या समोर आली व तिला धक्का लागला. त्यावरून दुचाकीस्वाराने बसचालकाशी वाद घातला. वाद वाढत जाऊन मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. वाहतूक विस्कळीत झाली. अर्धा तास बस पुढे जाऊ दिली नाही.
त्यावेळी जिल्हा पेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले. बससह दुचाकीस्वारालाही पोलिस ठाण्यात नेले. आज एका दुचाकीला धक्का लागला, नंतर अनेकांसोबत असा प्रकार घडू शकतो, त्यामुळे बसचालकाला समज मिळणे आवश्यक असल्याचे सांगत काहीही तक्रार नसल्याचे दुचाकीस्वाराने पोलिसांना सांगितले. त्यानंतर सव्वा पाच वाजेच्या सुमारास बस मार्गस्थ झाली. यात प्रवासी मात्र सव्वा तास ताटकळले.




















