जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२४
पारोळा येथे महामार्गालगतच्या कजगाव नाका चौफुलीवर बसने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार खाली पडून त्यांच्याजवळील असलेले जवळपास ३० लिटर दुध व कॅनचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. परंतु, नुकसान भरपाईसाठी दुचाकीस्वार व बस चालक, वाहकात तासभर वाद सुरू होता. सुज्ञ नागरिकांचा मध्यस्थीने भरपाई देण्याचे ठरल्यानंतर बस मार्गस्थ झाली. यामुळे चौफुलीवर जवळपास पाऊण तास वाहतूक कोंडी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ्याहून टिटवी, महिंदळेकडे जाणारी बस (एमएच ०६, एस-८५८३) ही शहरातील कजगाव नाका चौफुलीवर वळण घेत असताना दूध विक्रेता योगेश हाटकर यांच्या दुचाकीस बस धडकली. यात हाटकर हे खाली पडून त्यांच्या दुधाच्या कॅनसह जवळपास ३० लिटर दुधाचे नुकसान झाले. सुदैवाने हाटकर यांना कोणतीही इजा झाली नाही. या वेळी नागरिकांनी गर्दी करून रोष व्यक्त केला. या वेळी बस चालकाकडून दुचाकीस्वारासह नागरिकांनी झालेल्या नुकसानीची मागणी केल्याने वाद सुरू झाला. त्यातच पाऊण तास वाहतूक कोंडीही झाली. तासभरानंतर भरपाई देण्याचे ठरल्यानंतर वाद मिटला व बस मार्गस्थ झाली. दरम्यान, झालेली घटना व वाहतूक कोंडीबाबत पोलिस प्रशासनाला कळवले होते.
परंतु, वेळेत एकही कर्मचारी न आल्याने पोलिस प्रशासनाबाबत या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी हातगाडीचे अतिक्रमण वाढत आहे. यामुळे अनेक छोटे मोठे अपघात अथवा वाद होतात. मात्र त्यापुढे स्थानिक प्रशासन हतबल दिसून येते. या अतिक्रमणामुळे नागरिकांना दिवसेंदिवस अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, गुरुवारी पालिका व पोलिस प्रशासनातर्फे मुख्याधिकारी किशोर चव्हाण व पो.नि. सुनील पवार यांनी मुख्य बाजारपेठेसह महामार्ग व कजगाव नाका आदी अतिक्रमण धारकांचे तराजू काटे, छत्री व कॅरी बॅग जप्त केले. तसेच त्यांना दंड, कारवाई करण्याच्या सूचनाही केल्या. परंतु, शुक्रवारी परिस्थिती ‘जैसे थे’ दिसून आल्याने सुज्ञ नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
तर पालिका व पोलीस प्रशासनाने काढलेल्या अतिक्रमणामुळे कजगाव नाक्यासह मुख्य बाजारपेठेत दिवसभर मोकळीक होती. असेच सातत्य ठेवल्यास बेशिस्त वाहन पार्किंगसह फळ, भाजीपाला विक्रेते, हातगाडी धारकांकडून होणाऱ्या अतिक्रमणाला कायमस्वरूपी आळा बसण्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया व मत जनतेतून व्यक्त होत आहे. दरम्यान, पो. नि. सुनील पवार व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह पालिका कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी हातगाडी हटाव मोहिम सुरू केल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. या मोहिमेचे शहरातील नागरिकांसह महिलांनी स्वागत केले आहे.