जळगाव मिरर | २ जुलै २०२५
राज्याच्या राजकारणात आता महायुतीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र झाल्याने मोठी खळबळ उडाली असून आता पुन्हा एकदा मनसेच्या नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भारतीय जनता पक्षाने देशभक्तीचा ठेका घेतलेला नाही, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही देशभक्त असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरुन संदीप देशपांडे यांनी ही टीका केली आहे. राज्यात हिंदी सक्ती विरोधात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही देशभक्त असल्याचा दावा केला होता. यावर संदीप देशपांडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते देशभक्त नाहीत, असे कोणीच म्हटले नाही. त्यांनी विरोधकांना काय बोलावे आणि काय बोलू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र देशभक्तीचा ठेका हा केवळ भारतीय जनता पक्षाने घेतलेला नाही, अशा शब्दात देशपांडे यांनी सुनावले आहे.
या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशपांडे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही देशभक्त असल्याचा दावा केला आहे. मात्र ते देशभक्त नाहीत असे कोणी म्हटलेलेच नाही. ऑपरेशन सिंदूर झाले त्यावेळी बाहेरच्या देशांमध्ये देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच पाठवले गेले. त्यामुळे देशभक्ती केवळ आमचाच ठेका आहे, असे कोणीही समजू नये. ते योग्य देखील नाही, असे देखील संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर हा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारण्यात आला होता, असा आरोप भाजप करत आहे. या बाबतही देशपांडे यांना प्रश्न विचारण्यात आला. असे आरोप भाजपकडून होत असून याबाबत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी हा प्रश्न टोलवला आहे.
फक्त हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत का? की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात देखील दोन्ही पक्ष एकत्र येतील? असा प्रश्नही या वेळी पत्रकारांनी देशपांडे यांना विचारला. मात्र, याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षाचे प्रमुख नेतेच घेतील, असे देखील संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. पाच जुलै रोजी होणारा मेळावा म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची नांदी असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे पाहिले जात आहे.
